Tumgik
advpushpapatil · 3 years
Text
Tumblr media
0 notes
advpushpapatil · 5 years
Text
आम्ही बापुडे.......
आम्ही बापुडे हो काय करणार......
आठ दिवस श्रद्धांजली वाहणार,
दहा दिवस निषेध नोंदवणार
ठिकठिकाणी निदर्शने करणार
पंधरा दिवसांनी....
आमचं उसळतं रक्त थंडं पडणार
त्या वीरमर्दांचे शौर्यगान गाणार
देशभक्तीचा ध्वज त्यांचा त्यांना परत करून
आम्ही मात्र षंढ होणार
दुःखात चार कविता लिहिणार
तावतावात सहा लेख लिहिणार
कर्तव्यपूर्तीसाठी कँडल मार्च काढणार
सैनिक फंडात पैसे टाकून
कर्णाच्या थाटात वावरणार
शेवटी आम्ही बापुडे हो काय करणार........
आकांडतांडव कशासाठी
शत्रूपक्षाने त्याचा धर्म तर निभावला
शरमेची गोष्ट तर ही आहे.....
त्याच्या हातातला खंजीर
मेड इन इंडिया होता...
आता तीच पुन्हा वर्षनुवर्षे करत असलेली
...... भ्याड 'कडी निंदा' करणार
गद्दारांच्या नावाने बोटं मोडणार
खालच्या पातळीला जाऊन
राजकारण करणार
काही दिवसांनी पब मध्ये जाणार
बेधुंद पार्ट्या करणार
पुन्हा काही दिवसांनी बातमी येऊन धडकणार
कुणाच्या तरी पोटचा गोळा वीरमरण पत्करणार
कुणाचे तरी कुंकू पुसले जाणार
कुणाचे तरी पितृछत्र हरपणार
आणि आम्ही.....
पुन्हा असेच हळहळत बसणार.....
आम्ही बापुडे हो काय करणार.....
Adv. Pushpa patil
0 notes
advpushpapatil · 5 years
Text
जीवनगाणे
स्त्री कितीही पुढारलेली असो, विदुषी असो.. तिच्या मनात एक बाळबोध वळणाचं घर असतं. एक छोटसं घर ... अंगणात एक हिरवंकंच झाड, त्याची गर्द सावली अंगणभर पहुडलेली ... त्या लोभस अंगणात मुक्तपणे हुंदडणारी गोंडस पाडसं... घराच्या पावित्र्याची साक्ष देणारे तुळशी वृंदावन, समोर घराची लयबध्दता जपणारी रेखीव रांगोळी ... घरात मुक्त संचार करणारा झुळझुळता वारा, घराच्या खिडकीला लपेटून झुलणारी जाई—जुईची नाजूक वेल... रात्र��� घराच्या उघडया खिडकीतून झरलेलं चांदणं पांघरून लागलेली तृप्त झोप.... पहाटे पहाटे सुगंधी झुळूकेनं गुदगुल्या करत अलगद जागवावं. आपल्या नाजूक भावना जाणून घेणारा— त्यांना फुलवणारा जिवलग असावा... हात हातात घेऊन माझ्या डोळयांनी स्वतःची स्वप्न पहाणारा.... 
एक तृप्तता आसमंत व्यापून राहते ना ?
पण आता, हे अगदी साधसंच स्वप्न सुध्दा प्रत्यक्षात उतरत नाही. या सिमेंटच्या जंगलात फक्त फ्लॅटस्‌ मिळतात, घरं नव्हेत. आता या फ्लॅटस्‌ना अंगणंच नाहीत त्यामुळे मग ते हिरवंकंच झाडं, गर्द सावली... पाडसांचा मुक्तपणा..... तुळशीवृंदावन नि रांगोळी सर्वच बाद झालं. आता उंचच उंच इमारतींच्या मध्ये झुळझुळणारा वारा बंदिस्त झालाय. घराच्या खिडकीलाही ‘सेफ्टी ग्रील्स' ने दडपून टाकलयं. घरातली पाडसं सुध्दा शाळा नि क्लासेस यांना खो देत फक्त निवाऱ्यापुरतेच घरात येतात. आता ही पाडसं मुक्तपणे हुंदडू शकत नाहीत कारण त्यांना आपण ‘रेसचे घोडे' बनवलं! आणि जिवलगाची तर तऱ्हाच न्यारी ! घरात सुसंवादाऐवजी फक्त संभाषणच होत असतं! नाजूक भावना जाणून — बिणून घेण्याइतका त्याला वेळच नसतो (बऱ्याचदा तिलाही). तर हाती हात घेऊन स्वप्न बघणं स्वप्नातच ! मान्य आहे कि युग स्पर्धेच आहे. मनात असो—नसो वेगाला आपण बांधील आहोत — पण कुठे थांबावं, कुठे विसावावं याचं गणित आपण जुळवायला हवं. स्पर्धेत जरूर उतरावं — पण ही स्पर्धा जीवघेणी तर ठरत नाहीए ना, याकडे कटाक्षानं लक्ष द्यावं. वेग जरूर असावा पण त्या वेगामुळे आपला उर फुटत तर नाहीए ना, इतकं जागरूक असावचं. जास्तीत जास्त जमीन मिळवण्याच्या लोभापायी उर फुटेस्तोवर पळत राहिला आणि शेवटी मृत्यु आलेल्या माणसाची गोष्ट तर आपल्याला माहिती आहेच. तरीही मग वाचतोच आहोत — संगणक क्षेत्रातल्या, आयटी क्षेत्रातल्या तरूणांनी उमलत्या वयात केलेल्या आत्महत्या ..... पैशांच्या हव्यासापायी, कामाच्या ताणापायी आपण जगणं विसरत चाललोय का?
ऋतु येतात नि जातात पण झिम्माड वाऱ्याला चॅलेंज करून रिमझिमत्या पावसात चिंब भिजून कांदाभजी खाण्याची इच्छा कामाच्या ताणाखाली विरतेय ! मस्त गुलाबी थंडी आहे — कॉफीचा मगही आहे — पण तीचे /त्याचे हात पांघरून कॉफीचे घुटके घेण्याइतका वेळ नाहीए ! वसंत फुललेला बघणं — अनुभवणं असा त्यांचा सहवास लाभत नाहीए. गाण्याच्या तालावर हृदयाची तार झंकारत नाहीए. परिणामी मनावर ताणाची पुटं चढत जातात नि जीव घुसमटतो, या घुसमटीचा निचरा व्हायला हवाय!
रे मानवा....., ‘ग्लोबलायझेशन' च्या नावाखाली सारं विश्व जवळ आणलसं, ग्रह ताऱ्यांची अंतरं मोजलीस पण एका छताखाली रहाणाऱ्या माणसांमधला दुरावा मोजण्यासाठी कोणतं ‘परिमाण' वापरणार आहेस? मोठमोठया स्वप्नांपायी सहजसाध्य पण महत्वाच्या गोष्टी राहून जातात किंवा दुय्यम म्हणून टाळल्या जातात, आणि मग आयुष्य संपता — संपता लक्षात येतं ‘आपलं जगायचचं राहून गेलयं'! या स्पर्धेत उतरून एकदा का वेग घेतला की माणूस पिसाटल्यासारखा धावत सुटतो.  विसावायचं.... थांबायचं विसरून! ‘सारं काही' आणि ‘आत्ताच' मला मिळायला हवं, या हव्यासापोटी — गोष्टीतल्या त्या लोभी माणसाप्रमाणे आणखी — आणखी जास्तीत जास्त जमीन मिळवण्यासाठी धावतोय ... उर फुटेस्तोवर ! याचा परिणाम वेगळा काय होणार? काय मिळवतोय आपण? कोणत्या किंमतीत? याचे भान हवेच हवे!
रे मानवा... स्पर्धेत उतर — वेगही हवा पण ब्रेक मात्र आपल्या हातात राहू दे. ‘वेळ नाही' च्या सबबी खाली वसंतात हरवणं विसरू नकोस.... भन्नाट वाऱ्याला पाठ दाखवू नकोस — रिमझिमत्या पावसात ‘कोरडा' राहू नकोस .... नाजूक भावना न गोंजारता न फुलवता मनातच ठेवू नकोस .... चांदण्याचे हात जवळच आहेत त्यांना ignore करू नकोस ... स्वतःचं मूल वाढतांना बघण्याचं विसरू नकोस. यातलं सुख अमुल्य आहे, कितीही पैसा ओतलास तरी विकत न घेता येण्याइतकं! ज्याप्रमाणे एखादं सुरेल गाणं धृवपदावरून ताना घेत, लकेरी घेत पुन्हा धृवपदावर येतं, त्याचा सुरेलपणा, माधुर्य सुटावटी गुंफून ठेवण्यात असतं आणि त्यासाठी समेवर येणं आवश्यक आहे. पण हल्लीच्या जीवनगाण्यांमधली सुरावटच हरवलीय ... कारण समेवर येण्याइतका वेळच नाहीय. पुन्हा — पुन्हा समेवर येऊन वेळ घालविण्याऐवजी सगळी कडवी भराभरा म्हटली जात आहेत. आणि म्हणूनच ... म्हणूनच रे मानवा, तुझ्या जिवनगाण्याचा ताल बिघडला ... सूर बिघडला .... नि ठेका चुकला! तुझ्या जिवनगाण्यात सुरावट पेरण्यासाठी तुला थोडं थांबलच पाहीजे. जिवनगाणे तुला ‘गायचे' आहे, आयुष्य तुला ‘जगायचे' आहे, धावून धावून संपवायचे नाहीय. आणि म्हणूनच तुझ्या घरटयात तृप्ततेऐवजी हपापलेपण वास करतंय.
..... अजुनही जिवनगाण्याची काही कडवी शिल्लक आहेत. ये ... पुन्हा धृवपदावर ये... थोडा विसावा घे. काय मिळवलसं, काय गमावलसं, कुठे चुकलास — कुठे दुरूस्ती करावी... याचा नव्याने हिशेब कर. .... ये पुन्हा समेवर ये .... सुरावटी तुझी वाट पहात आहेत!  
ॲड. पुष्पा स. पाटील advpushpapatil.tumblr.com 1030, B-12,आकाशगंगा सोसायटी, मॉडेल कॉलोनी पुणे- 411016 मो. 9270064777
0 notes
advpushpapatil · 5 years
Text
नातं
नातं............ 
वसंतातला उल्हास आहे, जीवनाचा श्वास आहे ! कोकीळेचं कूजन आहे! मर्मबंधाचे सृजन आहे, जिव्हाळयाचे ‘पूजन’ आहे!! अर्थच सांगायचा म्हटलं तर- नातं एक सुखद ‘संवेदन’ आहे!!!
प्रत्येक नात्यात एक सुखद अनुभूती असते, त्या अनुभूतीच्या तालावर टाळी मात्र देता यायला हवी. नातं..... मग ते नाळेचा अर्थ सांगणारे माय-लेकराचे असेल, रक्ताची ओढ सांगणारे भावा-बहिणीचे असेल, काळजाच्या कुपीत जाऊन बसणारे मैत्रीचं असेल, रूसव्या-फुगव्यांची गंमत-जंमत असणारे नणंद-भावजयीचं असेल, कुणीही नसतांना सर्व नात्यांचे पदर असणारं, अनोख्या भावविश्वात विहरणारं पती-पत्नीचं असेल. नातं कोणतही असो, नात्याच्या मुळाशी आपुलकी आणि प्रेम असायला हवं. प्रत्येक नात्याला एक वेगळा गंध असतो. आपुलकीच्या पहाटवाऱ्यासरशी ते फुलतं ........ फुलत जातं.
सुख असो वा दुःख! सर्वप्रथम ज्या नात्याची आठवण होते ते नातं सर्वश्रेष्ठ! जन्मदात्यांशी असलेलं नातं शब्दातीत आहे. ते प्रेम, ती ममता ती आभाळमाया समर्थपणे पेलू शकतील असे शब्द मला तरी ज्ञात नाहीत! त्यांच्या छायेत सनाथ असल्याची जाणीव ठोसपणे होते. जिवनातले कितीही मोठे संकट पेलण्याची ताकद या नात्यातूनच मिळत असते. आपण कितीही मोठे झालो तरी लहान असण्याची लाडीक हौस येथेच हक���काने आणि हट्टाने पुरवून घेता येते. आपल्या काळजातली सल न सांगताही जेव्हा अंतराची सीमा पार करून भावा-बहिणीला अस्वस्थ करते, तेंव्हा ओढ म्हणजे काय, हे उमगते. लहानपणी छोटया-छोटया गोष्टींवरून मनसोक्त भांडणारी भावंडे जेंव्हा महिनोन् महिने दूर असतात तेंव्हा त्यांच्या आठवणी मात्र रणरणत्या उन्हातल्या आम्रछायेसारख्या दिलासा देत असतात.
  काहीवेळा नात्यात रूसवे-फुगवे अलगदपणे अवतरतात, नव्हे ती नातीच रूसव्या-फुगव्यांवर, मानपानावर आधारीत असतात. (बऱ्याचदा सासरची नाती) सासूने थोडसं तिरकस (च) बोलणं, सुनेने ते तेवढयाच बेफिकीरीने उडवून लावणं, यातही एक गंमत असते, फक्त मनात द्वेष न ठेवता ती गंमत अनुभवता यायला हवी! खरेतर नणंद-भावजया, दीर-भावजय, जावा-जावा हया नात्यांना योग्य दिशा मिळाली तर या नात्यांत मैत्रीचं रोपटं तरारून येतं, मशागत मात्र दोन्ही बाजूंनी व्हायला हवी.
प्रत्येक नात्यांचा एक एक पैलू असणारं अनोखं नातं म्हणजे पति-पत्नीचं! या नात्याला तर असंख्य पदर असतात. हळूवार फुलवलं तर अवघं आयुष्य सुगंधीत करून टाकतं. एक वेगळं आणि चिरतरूण भावविश्व ! सगळया नात्यांपेक्षा जास्त रूसवे-फुगवे यातच असतात, पण त्यांचीही निराळीच लज्जत असते!
तसेच मावशी, काकू, आत्या, मामी, काका, मामा या नात्यांनाही सुंदर छटा असतात. फक्त आपल्या नजरेला त्या दिसायला हव्यात. प्रत्येक नात्यात एक ओढ असते, ती ओढ मनाला जाणवायला हवी.
तसं लौकीक दृष्ट्या कोणतही नातं नसलेलं पण गहीरे बंध असलेलं मैत्रीचं नातं ...... मनाने मनाशी जोडलं गेलेलं. आनंदाचा गुणाकार आणि दुःखाचा भागाकार करणारं... मैत्र! नातं ..... म्हटलं तर खूप मजबूत, कणखर, संकटसमयी समर्थ साथ देणारं, वादाच्या भोवऱ्यातही अस्थिर राहणारं! आणि म्हटलं तर अत्यंत नाजूक आणि तरल .... हलकासा धागा ओढला गेला तरी उलगडून, विरून जाणारं. पण ही नाती ताणली जाणार नाहीत याची खबरदारी आपणच तर घ्यायला हवी ना? आजच्या सोशल मिडीयाच्या युगात सातासमुद्रापलीकडची माणसं जवळ येत असतांना जवळची नाती मात्र दुरावत चालली आहेत. नात्यांतला गोडवा हरवत चालला आहे. नात्यांमधली कर्तव्ये-हक्क विरत चालले आहेत. ‘आई आपला पहिला गुरू असते, आई आपले आयुष्य घडवते’, 'My Mother is my Life' अशाप्रकारचे आईचे उदात्तीकरण करणारे messages पाठवतांना घरात असलेल्या वयोवृध्द आईचे मन आपण कितीसे समजून घेतो? आणि ‘बायको’ तर खिल्ली उडवण्यासाठीच असते. ती खरेच अशी असते? मित्रप्रेमावर भरभरून मेसेजेस Forward करतांना आठवडयापासून आपला एक मित्र आजारी आहे, त्याला भेटायला जायला हवे हे आपल्या गावीही नसते.
दुरवरच्या  माणसांशी connected राहतांना घरातल्या माणसांशी मात्र संवाद हरवून बसलोय! ज्यांचा आपल्यावर हक्क आहे त्यांच्यासाठी मात्र not reachable  होतोय आपण! विचार करा.... ही नाती अस्तित्वातचं नसती तर ...? एका सुंदर, तरल अनुभूतीपासून आपण वंचित राहिलो असतो. खरं तर ‘नातं’ हे संपूर्ण प्राणी-विश्वात फक्त मानवालाच लाभलेलं एक सुंदर वरदान आहे. म्हणूनच ही नाती जोपासायला हवीत. नात्यात राग-लोभ असणारच, हे गृहीत धरून आपापसातले मतभेद मिटवायला हवेत. थोडसं सामंजस्याने, प्रसंगी कमीपणा घेवूनही हे नाजूक बंध हळूवारपणे हाताळायला हवेत. काही नाती जन्मतःच लाभलेली असतात तर काही विवाहानंतर निर्माण होतात तर काही आपणच मनाने जोडलेली असतात. नातं कोणतही असो त्याची योग्य रितीने आणि योग्य वेळी जोपासना होणे गरजेचे असते. रोपाला ज्यावेळी पाण्याची गरज असते तेंव्हा त्याला पाणी मिळायला हवे .... कोमेजून वाळून गेल्यावर त्याला कितीही पाणी, खत घातले तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही, ते रोप पुन्हा तरारून येत नाही. तद्वतच नात्यांचे ‘सर्विसिंग’ योग्य वेळी होणे महत्वाचे असते. आपण कुणासाठीतरी महत्वाचे आहोत, आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी कुणी प्रयत्न करतंय हे feeling किती छान आहे ना? आयुर्मान आपल्या जीवनाला Quantity देत असेल पण प्रेमळ नाती आपल्या जीवनाला Quality देतात. अशा या अमूल्य नात्यांमध्ये ताण निर्माण होवू न देण्याची जबाबदारी आपलीच तर आहे. कुणी सांगावं उद्याचा सुर्य आपण पाहणार आहोत की नाही, ..... पण ही नाती मात्र आपल्याला अजरामर करणार आहेत.... स्मृतींच्या रूपाने ! म्हणूनच ..... नाते जुळले (पाहीजे) ..... मनाशी मनाचे !          
Adv. पुष्पा  पाटील 1030/बी/12, आकाशगंगा सोसायटी, माॅडेल काॅलनी, पुणे-16 मो.नं. 9270064777
0 notes
advpushpapatil · 6 years
Text
निरोप
( युद्घावर निघतांना एका वीर सैनिकाने आपल्या आप्तांचा घेतलेला निरोप )
Tumblr media
देईन आधार, वृद्धत्वाला तुझ्या नंतर आई ;
आधी मात्रृभूमीच्या भाळावरती,
                          कुंकू तिरंग्याचे रेखून येऊ दे !!
बांध राखी, या मनगटावरती नंतर ताई;
                 आधी मानगूट त्याचे मोडून येऊ दे !!
नंतर ऐकवीन स्पंदने,ह्रदयीची प्रिये तुला;
     निधड्या छातीची,गरज सीमेवरची,
                                  मला भागवून येऊ दे !!
चालायाला शिकवीन , बोट धरुनी , नंतर बाळा ;
     'चाल’ त्याची आधी , नाकाम करून येऊ दे !!
नंतर  करीन ‘बँटींग’ तुझ्याशी रे मित्रा ;
       आधी 'बोलिंग’ सीमेवरची , रोखून येऊ दे !!
दुर्लक्शीले आतापर्यंत शेजार- शेजार म्हणूनी ;
      ��  खोड आता मात्र त्याची जिरवून येऊ दे !!
बागच (काश्मिर) काय, देणार नाही एक फुलही त्याला;
स्वप्ने त्याची आता मात्र धुळीला मिळवून येऊ दे !!
तो 'बच्चा ’ दाखवतो आहे, गर्मी या बापाला;
          आता मात्र त्याला तेथेच गोठवून येऊ दे !!!!
2 notes · View notes
advpushpapatil · 6 years
Text
मस्त कलंदर -- किशोरदा !!!
सिनेसंगीताच्या इतिहासात 4 आॅगस्ट हा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेलाय ! 1929 साली याच दिवशी आभासकुमार गांगुली नावाचा अवलिया या पृथ्वीतलावर अवतरला ! तलत मेहमूद, मो. रफी यांसारख्या मुलायम आवाजांची चलती असतांना एका दमदार, मर्दाना व भारदस्त आवाजाने हृदय काबीज केले.
किशोरदांनी ‘जिद्दी’ या चित्रपटासाठी प्रथम गायन केले. नंतर ‘आ चल के तुझे, मैं लेके चलूॅं, एक ऐसे गगन के तले’ असं म्हणत अलगद बोट धरून त्याने संगीत-दुनियेतली बहुरंगी, जादुई मुशफिरी घडवून आणली. ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ म्हणत आयुष्यावर प्रेम करायला शिकवलं. किशोरदांच्या अंगी शब्दशः नाना कळा (कला) होत्या. एकाच वेळी गायन, अभिनय, गीत, संगीत व दिग्दर्शन या क्षेत्रात स्वतःची अमिट छाप सोडणारे अष्टपैलू कलाकार ! किशोरदाच्या या नाना कळा त्यांच्या आवाजातून व गायकीतूनही दिसत. 'मुसाफिर हूँ यारो, न घर है ना ठिकाना’ म्हणत भारदस्त आवाजातही सुरेलपण असतं याचा ‘परिचय’ करून दिला. त्याचवेळी ‘मैं हूँ झुम झुम झुमरू’ सारखी उडत्या चालीची गाणी हा अवलिया लिलया गातो. ‘इना मीना डिका’, ‘रफ्ता रफ्ता देखो आॅंख मेरी लडी है’ असो वा ‘दिन जवानी के चार यार प्यार किए जा’ सारखी नटखट गाणी तर किशोरदांचा हातखंडा!
आपल्या गायकीतून मस्ती करणारा हा अलबेला गायक जेंव्हा ‘मेरी भिगी भिगी सी पलकोंपे रह गए’ म्हणत ‘अनामिकेला’ सुनावतो किंवा ‘मेरे मेहबूब कयामत होगी’ सारखी गंभीर गाणी म्हणतो तेंव्हा आपण स्तंभित होतो.
त्याच्या आवाजात छेडखानी होती, मस्ती होती, शरारत तर ठासून भरलेली होती. ‘एक लडकी भीगी-भागी सी’ आणि ‘एक चतुर नार बडी होशीयार’ म्हणत ‘पडोसन’ शी शरारत करतांना या तिकडमबाजाने जी काही जुगलबंदी केलीय ती अवर्णनीयच ! हाच शरारती आवाज ‘छूकर मेरे मन को’ म्हणतो तेंव्हा रोम रोम थरारून जातं आणि छेडलेल्या हृदयाची सतार मग झंकारतच राहते.
‘ले गयी मेरा दिल तेरी जुल्मी नजीरया’ म्हणणारा हा अवलिया ‘मेरे नैना सावन-भादो’ म्हणतो तेव्हा काळजात काहीतरी तुटत राहतं. ‘जान मेरी रूठ गयी, जाने क्यूॅं हमसे’ म्हणत प्रेयसीची मनधरणी करणारा नटखट आवाज मस्त हलकाफुलका मूड बनवतो तर ‘तेरे बीना जिंदगी से कोई शिकवा नही’ म्हणतो तेव्हा मनातली दुखरी नस ठसठसायला लागते.
‘दो बातें प्यार भरी कर लूॅं?’ हा शरारती सवाल जेव्हा सामोरा येतो तेव्हा मला वाटतं अभिनेता कोण आहे व त्याला अभिनयाचं अंग कितपत आहे हा प्रश्नच उरत नाही. गायनातून अभिनयही करण्याची ही त्याची तऱ्हाच न्यारी!
कस्में वादें, कोरा कागज था ये मन मेरा, करवटे बदलते रहे, नजराना भेजा किसीने प्यार का, एक मैं और एक तू- अशी रोमँटिक गाणी तर किशोरदांची खासीयत!
ओ हंसिनी, खिलते है गुल यहाॅं, ये रातें ये मौसम नदी का किनारा, तुम आ गए हो नूर आ गया है, तेरे जैसा यार कहाॅं असो किंवा ‘आॅंखो आॅंखों में हम तुम हो गए दिवाने’ पल पल दिल के पास, मेरे दिल में आज क्या है’ यासारखी बुलंद आवाजातली गाणी तर खास किशोर शैली!
गाणं कोणत्याही मूडमधलं असो, असं वाटत अरे ही तर किशोरदांची खासीयतच. आता उदाहरणच द्यायच म्हटलं तर ‘मेरे होश ले लो दिवाना बना दो’ हे रोमॅंटीक गाणं किशोरदांची खासीयतच आहे तर ‘चिंगारी कोई भडके’ हे काय आहे? ‘समझौता गमोंसे कर लो’ म्हणत जीवनाचे गंभीर तत्वज्ञान सांगणारा ‘खईके पान बनारसवाला’ म्हणत थिरकायला भाग पाडतो.
‘समां है सुहाना सुहाना नशे में जहाँ है’ हे मदहोश गीत ऐकतांना मन रोमांचीत झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या गायकीच्या विभिन्न शैलीने किशोरदांनी आम्हा रसिकांना समृध्द केलय! आपला मूड कोणताही असो किशोरदांची गाणी ऐकतांना आपणही त्याच रंगात रंगून जातो आणि हे असं ‘सरेंडर’ होणं आपण एन्जाॅयच करतो......... नाही का? मन उदास असले तरी किशोरदांची नटखट गाणी ऐकली की उत्साहाची कारंजी उसळायला लागतात!
तसेच याॅडलींग करावं तर फक्त आणि फक्त किशोरदांनीच! राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांना सुपरस्टार पदाला पोहचवण्यात किशोरदांच्या आवाजाची जादू दूर्लक्षीत करून चालणार नाही.
‘8 वेळा फिल्मफेअर’ हा मानाचा पुरस्कार मिळवणाऱ्या या अवलिया गायकाने गायनाचे शास्त्रशुुध्द शिक्षण घेतले नव्हते हे जेव्हा आपल्याला कळते तेव्हा त्याचे ‘पग घुंगरू बाॅंध मीरा नाचे’ मधील पा-नी-सा-मा-पा-नी हे स्वर मेंदूभोवती फेर धरतात आणि शाास्त्रशुध्द शिक्षण म्हणजे आणखी काय असतं? असा गहन प्रश्न आम्हा पामरांपुढे उभा राहतो.
जेव्हा किशोरदाने ‘अश्विनी ये ना ऽऽऽऽ’ अशी मराठमोळी साद घातली तेव्हा आपण म्हराटी रसिक भरून पावलो.
या महान गायकाने रसिकांना भरभरून आनंद दिला.
किशोरदा भले शरीराने आपल्यात नसतील पण आपल्या भावविश्वात त्यांनी चिरस्थायी स्थान पटकावलयं!
बस्स किशोरदा -
कभी अलविदा ना कहना .....................
.
अॅड. पुष्पा पाटील
advpushpapatil.tumblr.com
2 notes · View notes
advpushpapatil · 8 years
Text
महानायक
Tumblr media
          गेली कित्येक दशके ‘अमिताभ बच्चन’ हे नाव माझ्याच काय, लाखो-करोडो रसिकांच्या मनावर गारूड करतंय! मला आठवतंय - माझ्या लहानपणी मला नाव माहिती असलेला पहिला, एकमेव अभिनेता - अमिताभ ! ‘मुकद्दर का सिकंदर’ हा सिनेमा पाहून आम्ही भावंड त्याचे फॅन झालो ते आजतागायत आहोत. त्याच्या त्या दे दणादण फायटिंगवर आणि धम्माल काॅमेडीवर तर आम्ही बच्चे कंपनी एकदम फिदा!
         सुरूवातीला त्याची ताडमाड उंची, त्याचा चेहरा आणि आवाज यामुळे अनेक निर्मात्यांनी म्हणे त्याला नाकारले होते. पुढे याच तीन गोष्टींना स्वतःची ‘शक्ती’ बनवून हा ‘गॅम्बलर’, ‘द गे्रट’ ठरला आणि स्वतःला ‘महान’ अभिनेता म्हणून सिध्द केले. ‘जंजीर’ मध्ये अॅंग्री यंग मॅन चा ब्रँड तयार झाला आणि मग यशस्वी चित्रपटांचा ‘सिलसिला’ सुरू झाला. अमर अकबर अँथनी, सुहाग, सत्ते पे सत्ता, शोले, दो और दो पाँच, याराना, शान, नसीब, नमक-हलाल, लावारिस, राम-बलराम मध्ये मस्त काॅमेडी करणारा एक मस्त कलंदर भेटत राहतो तर जंजीर, अग्नीपथ, आखरी रास्ता, दीवार यांत एक ‘अँग्री यंग मॅन’ भेटतो. हा डॅशींग अॅंग्री यंग मॅन विशेष खुलायचा तो इन्स्पेक्टरच्या वेशात आणि पेशात.
        नंतर जरा मोठं झाल्यावर त्याची डायलाॅग डिलीवरी विशेष आवडायची! मग नंतर त्याच्या डोळयातला अभिनयही समजायला लागला. हा अँग्री यंग मॅन ‘कभी कभी’ ‘सिलसिला’, ‘कस्में वादे’ सारख्या चित्रपटांत ‘रोमँटिक’ हिरो म्हणूनही कुठेही कमी पडला नाही. ‘कभी कभी’ या चित्रपटात तो नायिकेला उद्देशून म्हणतो - ‘आपकी अँखे जहँ देखती है, एक रिश्ता कायम कर देती है!’ पण मला वाटतं हे विधान त्याच्याच डोळयांसाठी जास्त समर्पक ठरतं. त्याच्या डोळयांत विलक्षण जादु आहे, कोणताही भाव प्रभावीपणे साकारण्याची ताकद आहे. त्याच्या हृदयाताला ज्वालामुखी त्याच्या डोळयांत प्रकटला ‘जंजीर’ मध्ये, तर ‘शक्ती’ मध्ये परिस्थितीमुळे चुकीच्या मार्गावर गेलेला, भरकटलेला तरूण साकारला. ‘मैं ने तो फोन पर अपने बाप से बात की थी लेकिन दुसरी तरफ से एक पुलीस अफसर की आवाज सुनाई दी थी।’ हा डायलाॅग, डायलाॅग डिलीव्हरी, त्याचा धीरगंभीर स्वर आणि त्याची करूण नजर मनाची कालवा कालव करते. भूमिका नकारात्मक असूनही हा मन जिंकूनच घेतो. तीच गत ‘दीवार’ ची ! त्याची ती अगतिकता - त्याच्या डोळयातली वेदना पडदा व्यापून उरते. ‘फरार’ मधीला अमिताभ खुप वेगळा वाटला. त्याच्या डोळयांतला हताश भाव काळजाला चटका लावून जातो. ‘शोले’ तल्या ‘जय’ चे अव्यक्त ��्रेम त्याच्या डोळयातून प्रभावीपणे, लाखो शब्दांना हरवत व्यक्त होतच होते. मला आठवतंय ‘कुली’ च्य शुटींगच्या वेळी, लोकप्रियतेच्या शिखरावर असताना, त्याला गंभीर इजा झाली होती. घरातलं माणूस जीवघेण्या आजारात असल्यासारखे लोक देवाची करूणा भाकत होते.
         पत्नीच्या लोकप्रियतेपुढे फिका पडू लागलेला ‘अभिमान’ दुखावलेला पती साकारणं एक आव्हानच होते, पण ते शिव-धनुश्य लिलया पेलले याने. हा अश्टपैलू अभिनेता दिवसेंदिवस जास्तच प्रगल्भ होत गेला. नाही म्हणायला या ‘जादुगर’ ची जादू जरा कमी होत चालली होती, पण पुन्हा त्याची दमदार सेकंड इनिंग सुरू झाली. ‘खाकी’ मधला प्रामाणिक पोलीस आॅफिसर तर त्याची खासियतच! ‘कभी खुशी कभी गम’ मधला त्याचा ‘उसूलों पर अडिग रहनेवाला पिता’ असो वा ‘वक्त’ मधला मुलावर बेइन्तहा माया करणारा पिता - वाचिक, कायिक आणि मुद्राभिनयाला कुठेही ऊणं-दुणं ठेवेल तो अमिताभ कसला? अर्थातच भूमिका छापा असो वा काटा - बाजी जिंकणार हाच ‘शहेनशहा’!
           हीच गोष्ट के.बी.सी. ची नम्रतेने आणि समोरच्या व्यक्तीला पूरेपूर सन्मान देत बोलण्याची त्याची विलक्षण अदा - आजही फिदा व्हायला भाग पाडते. कंटेस्टंट बद्दल पुरेपुर विनम्रता दाखवत, शब्दांचा खेळ करणं, डोळयांच्या कोनातून केलेली मस्ती, कंटेस्टंट ची फिरकी घेण्यासाठी दातांखाली खालचा ओठ दाबत कंटेस्टंटचा गोंधळ मिस्किलपणे न्याहाळणं सारं काही लाजवाबच! त्याचा धीरगंभीर आवाज, हिंदीवर कमालीचं प्रभुत्व, शुध्द उच्चारण आणि विनम्रता यामुळे प्रेक्षकांवर छाप पाडतो. हरिवंशराय बच्चन या श्रेष्ठ कवीचे संस्कार त्याच्या शब्दाशब्दांत व्यक्त होतात. उत्तुंग लोकप्रियता, यश आणि रसिकांचं भरभरून प्रेम इतका प्रदिर्घ कालावधी लाभणारा आणि या वयातही सुपरस्टार असणारा - हाच तो महानायक! या सुस्ंस्कृत अभिनय सम्राटाच्या अभिनयाच्या कंगोयांना स्पर्श करण्यासाठी सुध्दा एखादा ग्रंथही उणा पडावा.
           अभिनय क्षेत्रात हिमालयाची उंची गाठलेल्या या विनयशील महानायकाला उदंड आयुष्य लाभो……. त्याच्या लोकप्रियतेइतकं!
0 notes
advpushpapatil · 8 years
Text
निरोप
( युद्घावर निघतांना एका वीर सैनिकाने आपल्या आप्तांचा घेतलेला निरोप )
Tumblr media
देईन आधार, वृद्धत्वाला तुझ्या नंतर आई ;
आधी मात्रृभूमीच्या भाळावरती,
                          कुंकू तिरंग्याचे रेखून येऊ दे !!
बांध राखी, या मनगटावरती नंतर ताई;
                 आधी मानगूट त्याचे मोडून येऊ दे !!
नंतर ऐकवीन स्पंदने,ह्रदयीची प्रिये तुला;
     निधड्या छातीची,गरज सीमेवरची,
                                  मला भागवून येऊ दे !!
चालायाला शिकवीन , बोट धरुनी , नंतर बाळा ;
     'चाल' त्याची आधी , नाकाम करून येऊ दे !!
नंतर  करीन 'बँटींग' तुझ्याशी रे मित्रा ;
       आधी 'बोलिंग' सीमेवरची , रोखून येऊ दे !!
दुर्लक्षीले आतापर्यंत शेजार- शेजार म्हणूनी ;
         खोड आता मात्र त्याची जिरवून येऊ दे !!
बागच (काश्मिर) काय, देणार नाही एक फुलही त्याला;
स्वप्ने त्याची आता मात्र धुळीला मिळवून येऊ दे !!
तो 'बच्चा ' दाखवतो आहे, गर्मी या बापाला;
          आता मात्र त्याला तेथेच गोठवून येऊ दे !!!!
2 notes · View notes
advpushpapatil · 8 years
Text
अतिशहाणी ताई
बघं ना गं आई ,
ही  अतिशहाणी ताई....
’गप्प बस-गप्प बस'
सारखी मला म्हणते ,
'लहान आहेस , समजत नाही',
सारखी मला हिणवते !!
             बघावं तेव्हा स्वत:च्याच,
            तोऱ्यात  असते !
            चिडवलं की मग कशी
            कोपऱ्यात बसते!!
समजते मला वेडाच जसा,
खोड्या माझ्या दिसतात,
चिमटा मात्र तिचा...
दिसत नाही कसा?
Tumblr media
            आई दोघांची,
            बाबा दोघांचे ,
            घरही दोघांचं ,
            पेन मात्र मग...
            एकटीचं कस्सं ??
गोड गोड बोलून कामं करून  घेते ,
गरज पडली मला कि 'कट्टी फू ' करते !
स्वत:ला का गं ही फार शहाणी  समजते?
तिचाही पसारा नावावर माझ्या खपवते !!
            पण मीही काही इतका
            भोळा नाही...
            'ताईगिरी' हिची ,
            चालू देणार नाही!
            मीही तिला ओवाळणी
            काही घालणार नाही !!!
0 notes
advpushpapatil · 8 years
Text
खट्याळ बाळ
        बघ ना गं आई...
        बाळ तुझं लाडाचं
        भारी मला छळत
        खोड्या काढुनी माझ्या,
        घरभर पळतं....
बघ तरी बघ,
पुस्तकाच्या पत्रावळ्या
केल्या त्यानं कशा,
वहीत बाईंच्या चित्रावर
काढल्या त्यानं मिशा !!
Tumblr media
                 पेन माझं पळवतो,
        वर केस माझे ओढतो !
        गुद्दा घातला पाठीत,
        की भोकाड मोठ्ठं पसरतो !!
सारं घरच कसा हा
डोक्यावर घेतो ,
जागा प्रत्येक वस्तुची
कसा बरे बदलतो ??
        झंजावात आहे की,
        घोंघावणारं वादळ जसा !!
        उद्योग इतके सारें करूनही,
        दमत  नाही कसा??
'मोठी मोठी' म्हणून
गप्प मलाच बसवतेस,
खट्याळाला मात्र त्या,
जवळ प्रेमाने घेतेस !!
        सांगून ठेवते मी ही ,
        त्याला अशी बधणार नाही,
        यंदा त्याला राखी
        मुळी बांधणारच नाही !!!
0 notes
advpushpapatil · 8 years
Text
वीर जवाना
Tumblr media
सुखरूप  आम्ही इथे, कारण सीमेवर,
                                 जवान तू आहेस !
मर्त्य आम्ही बापुडे,वीर खरा 'अमर'
                                 जवान तू आहेस !
धन्य ती कूस, जिथे अंकुरला,फुलला तू...
      भारताचा हे सैनिका,मुर्तिमंत
                      मान-अभिमान तू आहेस !
'प्रभू राम' आहे हा भारत आपुला...
       ह्या रामाचा सेवक सच्चा,
                              'हनुमान' तू आहेस !
दफन केले विधीपूर्वक शत्रुलाही ज्या देशाने...
महान हा भारत माझा,या देशाची, हे सैनिका,
                                   शान तू आहेस !
ऋण आहे हिमालयासम,करोडों शिरांवरी तुझे वीरा,
        शत: शत: नमन तुजला, धन्य धन्य,
                                 जवान तू आहेस !!!
0 notes
advpushpapatil · 8 years
Text
मैत्री
मैत्री….......वेगळं तरी काय असते?
                दुधावरची साय असते !
                भावनांची माय असते !
                भक्कम आधाराचा पाय असते !
मैत्री….......जरी रक्ताचं नातं नसते !
                मनातला रेशमी धागा असते !
                दुःख वाटण्याची जागा असते !
Tumblr media
                       मैत्री….......आनंदाचा गुणाकार असते !
                दुःखाचा भागाकार असते !
                माणुसकीचा आकार असते !
मैत्री….......निष्पाप मनाच्या मातीत रुजते !
                संवेदनेच्या ओलाव्याने अंकुरते !
                आपलेपणाच्या पाण्याने उमलते !
                रोपट्याला आता या वाढवूया !
                दिवसा गणिक फुलवूया !
                लाभले हे स्वर्गीय लेणे !
                काहिही न आता उणे !!!
0 notes
advpushpapatil · 8 years
Text
फ्रेंडशिप बँड
             काय करावे काही समजत नाही !
             आईचा विचार डोक्यातून जात नाही!!
     सकाळी मला मस्त लोळायचे असते,
     आईला मात्र पटापट आवरायचे असते!!
                    चित्रे रंगवण्याची
                    मला आवड भारी,
          हिला मात्र दोस्तांनो
          'होमवर्क'चीच घाई!!
                  असं वागू नको,तसं करू  नको...
                  असं बसावं  ,तसं बोलावं...
                   शहाण्या मुलासारखं वागावं!
                   प्रत्येक गोष्टीत टापटीप असावं!!
     मग मात्र गड्यांनो डाव एक साधला,
     "फ्रेंडशिप बँड" आईलाच बांधला...
                 तेव्हापासून सारं पालटलयं चित्र
                 आई माझी मैत्रिण नि मी आईचा मित्र!!
Tumblr media
1 note · View note
advpushpapatil · 8 years
Text
सुरगंधर्व ♫♫♫
Tumblr media
आपल्या सिनेसृष्टीत अनेक दिग्गज गायक झालेत पण यातही आपल्या विशेषत्वाने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे, एवढा नावलोकिक मिळवूनही अतिशय विनम्र व्यक्तिमत्व - मोहम्मद रफी।
              विविध भाषांत जवळपास 20,000 गाणी गाणारा, तब्बल 6 वेळा फिल्मफेअर हा मानाचा पुरस्कार मिळवणारा, 1967 साली ‘पद्मश्री’ या मानाच्या किताबाने गौरविला गेलेला अतिशय सुसंस्कृत गायक अर्थातच तुमचा-माझा सर्वांचाच लाडका सुरगंधर्व - मो. रफी।
              अशा या सुरगंधर्वाचा जन्म 24 डिसेंबर 1925 रोजी झाला होता. संगीतकार शामसुंदर यांनी ‘गुलबलोच’ या पंजाबी चित्रपटासाठी रफीच्या आवाजाचा प्रथम वापर केला.
              माझाी आणि रफीची ओळख अगदी लहानपणचीच. ‘हसा मुलांनो हसा’ म्हणत रफीने आपले सर्वांचेच बालपण समृध्द केले. रफीने कितीतरी तर्हे तर्हेची गाणी गायली. कितीतरी भाषांतून गायली. पण कोणत्याही भाषेत असो वा कोणत्याही मूडमध्ये असो त्याचा आवाज काळजाला भिडतोच भिडतो. बालगीत असो, भक्तीगीत असो, गजल असो, कव्वाली असो, ठुमरी असो, विरहगीत, प्रेमगीत, प्रणयगीत असो वा देशभक्तीपर गीत असो कुठेही तो परका वाटत नाही. या उलट त्याच्या आवाजाशिवाय आपल्या कोणत्याही मूडला पूर्णत्व येत नाही. परवाचीच गोष्ट... टेरेसवर पडल्या पडल्या ते अनंत आकाश न्याहाळणं आणि आकाशात डोकावणार्या चांदण्या डोळ्यांत साठवणं खरं तर माझा छंदच पण कुणास ठाऊक आज मन रमत नव्हतं. काही तरी उणीव भासत हो��ी.... अचानक जाणवलं.... आपला रफी! हीच कमतरता होती तर! म्हणूनच सुखद वार्यामुळेसुद्धा मोरपीस अंगावरून फिरत नव्हतं. खरंच! महंमद रफी आपल्या आयुष्यात इतका भिनलाय, की त्याच्या गाण्याशिवाय आपली कोणतीही भावस्थिती, अनुभव अधुराच राहावा.
इंद्रधनुष्यत ज्याप्रमाणे नानाविध छटा असतात, तद्वतच रफीच्या आवाजाच्यासुद्धा एकापेक्शा एक सरस अशा सुंदर छटा आहेत. असा कोणता भाव आहे, जो त्याच्या आवाजात व्यक्त झालेला नाही? किशोरकुमारची मस्ती, मुकेश��ा दर्द आणि तलत मेहमू��ची तरलता अशा तिहेरी संगमांच्या पहाडी आवाजाचंच नाव- महंमद रफी !
झोपाळ्यावाचून झुलणार्या वयात मनातला प्रत्येक तरुण भाव रफीच्या आवाजात जन्म घेऊन त्याच्याच आवाजावर विसावला होता. ‘लाखो है निगाह में, जिंदगी की राह में’ मधली बेफिकिरी, ‘अकेले हैं, चले आओ,’ च्या एकनिष्ठतेपुढेच झुकली होती.
रफीच्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर सोडविलेल्या गणितांनी परीक्षेत कधीही दगा दिला नाही. अजूनही जेव्हा जेव्हा ती गाणी ऐकते, तेव्हा तेव्हा ते गाणं अनुभवलेले क्षण जसेच्या तस्से जिवंत होऊन त्या त्या अनुभूतीचं मोरपीस अंगावरून फिरवून जातात. ही किमया आहे केवळ आणि केवळ रफीचीच !
‘चौदवी का चाँद हो, या आफताब हो....’ या गाण्यावर आपोआपच धुंद होऊन पापण्या जडावतात, वाटतं.... बस्स.... यापुढे काहीही नसावं... इथंच या आवाजातच विरून जावं. रफीच्या आवाजाव्यतिरिक्त काहीही ऐकू नये व पाहूही नये.
प्रियकराची ओढ आणि आवेग ‘बहारों फूल बरसाओ मेरा मेहबूब आया है’ या गाण्यात किती उत्कटतेनं व्यक्त झालाय! प्रेयसीला सजविण्याचं आव्हान त्यानं खुद्द निसर्गालाच केलंय ! त्याच्या आवाजातल्या मलमलीवर फिदा होऊन निसर्गानंही ते आव्हान नक्कीच स्वीकारलं असणार.
आपल्या आयुष्यात ‘न भुलण्या’ जोगी ‘बरसात की रात’ जरी आलेली नसली तरीही, ‘जिंदगी भर नहीं भूलेंगी वो बरसात की रात’ असं जेव्हा रफी म्हणतो, तेव्हा आपल्याही जिंदगीत अशी बरसात की रात येऊन गेलीय असं मन कसं काय बजावत राहतं, हे एक देवाला आणि दुसरं रफीलाच ठाऊक !
‘जो वादा किया वो निभाना पडेगा’ हे एक नितांत सुंदर गाणं ! त्याचं तरल संगीत आणि दोन अप्रतिम आवाज लता-रफी यांमुळे तर हे गाणं केवळ स्वर्गीय होऊन गेलंय... आणि आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतंय.
‘पऽऽऽत्थर के सनम’ असं गाण्याच्या सुरवातीला जेव्हा रफीचा आवाज काळीज चिरत जातो, तेव्हा हृदयात जी कळ उठते... कोणत्याही बेवफाला हे दोनच शब्द हज्जार शिव्यांपेक्षाही जास्त बोचले असतील, यात शंकाच नाही.
‘दोनोंने किया था प्यार मगर मुझे याद रहा, तू भूल गयी’ या गाण्यात ‘ओऽऽऽ मेरी महुआ’ अशी आर्त साद जेव्हा रफी घालतो, तेव्हा दस्तुरखुद्द परमेश्वरसुद्धा त्याच्या ‘महुआ’ला पृथ्वीवर परत पाठविण्यास मजबूर व्हावा.
‘अगं पोरी संभाल दरियाला तुफान.......’ सारखे कोळीगीत असो, ‘हा छंद जिवाला जडला’ किंवा ‘हा रूसवा सोडसखे’ म्हणणारा लाडिवाळ प्रियकर असो, प्रत्येक गाण्याला पुरेपुर न्याय देणारा अष्टपैलू स्वर म्हणजेच - मो. रफी. ‘नको भव्य वाडा नको गाडी घोडा’ असे लाडीकपणे म्हणत प्रियतमेची मनधरणी करणारा हाच स्वर जेंव्हा ‘प्रभु तु दयाळू कृपावंत दाता’ किंवा ‘नको आरती की नको पुष्पमाला’ म्हणतो तेंव्हा ऋषीतुल्य होतो. ‘आहे अजुन ओली इश्कातली निशाणी’ आणि ‘विरले गीत झाली मनाची शकले’ या सारख्या गजला तर त्यांची खासियतच। ‘जाग दिले दिवाना ऋतु जागी वस्ले-यारकी’ हे अस्सल उर्दुपण जेंव्हा हळवेपणाने ‘शोधीसी मानवा राऊळी मंदिरी’ म्हणतं तेव्हा या पहाडी आवाजाच्या सहजतेपुढे, आत्मविश्वासापुढे आपण मंत्रमुग्धपणे नतमस्तक होतो.
रफीच्या आवाजाशी, गाण्यांशी समरस होण्यासाठी तरी कुणावर तरी प्रेम करावं, त्याच्या दर्दे-दिलशी एकरूप होण्यापुरती तरी प्रेयसीनं बेवफाई करावी, असं प्रत्येक तरुण दिलाला वाटत राहतं.
रफीच्या आवाजाच्या सप्तरंगी छटांपैकी विशेष भावणारी आणि मंत्रमुग्ध करून सोडणारी छटा- त्याचा नशीला आवाज! ‘छलकाए जाम, आपकी आँखोंके नाम’ मध्ये पहिल्याच ‘छलकाए’ मधून जी बेधुंद नशा छलकत जाते.... जिंदगीभर त्या नशेतून शुद्धीवर येऊ शकत नाही... येऊ इच्छितही नाही.
‘ऐ नर्गिस-ए-मस्ताना’ म्हणत अशी काही प्यारी शिकायत करतो... तसेच ‘चेहरे पे गिरी जुल्फे... गुस्ताखी माफ’ म्हणत इतकी रोमॅंटीक माफी मागतो कि मन म्हणत... अरे बाबा गुस्ताखी तु नाही करायची तर मग कुणी...? त्याचवेळी ‘सौ बार जनम लेंगे सौ बार फनाह होंगे’ या गीतातून धीरगंभीरपणे प्यार - मोहब्बत उथळ भावना नसून गंभीरतेने घेण्याची चीज आहे हे ही पटवतो. हाच संगीतसाम्राज्याचा ‘प्रिन्स’ थिरकणार्या आवाजात ‘बदन पे सितारे लपेटे हुए’ म्हणत आपल्या प्रतिभासंपन्नतेपुढे नमवतो.
रफीच्या आवाजात एक गहराई होती, शालीनता होती, समर्पकता होती.
              ‘रिमझिम के गीत सावन गाए’, अगर ‘अगर तुम भूला ना दोगे’ या सारखी गाणी ऐकतांना एखादी रेशीमलडी उलगडत जावी त्याप्रमाणे त्याचा भावमधूर स्वर उलगडत आपल्या हृदयाचा ताबा घेतो.
              ‘रोशन तुम्हीसे दुनिया रौनक तुम्ही जहान की’ हे पारसमणी गीत अशा काही नजाकतीने गायलयं- त्याचा तो आश्वासक स्वर हृदय भारून टाकतो. त्या स्वरातल्या सच्चेपणावर काळीज ओवाळून टाकावसं वाटतं. भावमधूर गीतांच्या बरोबरीने ‘जंगली’ चे ‘याहू’, ‘वा वा इस दिवाने दिलने’, ते ‘जान पहचान हो’ अशी मस्तीभरी उडत्या चालीच्या गाण्यांनाही पुरेपुर न्याय दिला.
प्रत्येक पावलावर वीज तोलण्याच्या वयात रफीचा धुंद आवाज ‘जानेबहार हुस्न तेरा बेमिसाल है’ म्हणत कानात गुंजत राहतो. याच गाण्यातील ‘कमाल है’ हे शब्द रफीने आपल्या नशिल्या आवाजात असे काही उच्चारलेत, की आपल्याला कमालच वाटते.त्याच्या आवाजाने हृदयाची सतार झंकारली नाही असा जीव विरळाच.
हा सुरंगधर्व गायनाला समर्पित होत असे. निर्जीव शब्दांमध्ये आपल्या अमृतमय स्वरांची प्राणप्रतिष्ठा स्थापन करून कित्येक गीते अमर केली. म्हणूनच ज्या गीतांना रफीस्वराचा टच मिळाला ती गीते अनमोल कुंदन बनले!
रफीनं गायलेलं गाणं कोणत्याही दिग्गज गीतकारानं लिहिलेलं असो, कोणत्याही दिग्गज संगीतकारानं संगीतबद्ध केलेलं असो, ते गाणं केवळ आणि केवळ रफीचंच होऊन जातं. 31 जुलै 1980 रोजी नियतीनं क्रुरतेनं गदागदा हलवून आवाजाच्या दुनियेला पडलेलं ‘रफी’ नावाचं रेशीमस्वप्न संपवलं. पण आपला रफी केवळ एक व्यक्ती नव्हती, केवळ एक आवाज नव्हता, तर प्रत्येक मनामनाला गंधित करणारी, अमृत शिंपणारी एक मूर्तिमंत, चिरतरुण, स्वर्गीय अनुभूती आहे.
वंश, जाती-धर्माच्या भिंती भेदून,
तुझ्या ईश्वरी आवाजाच्या रूपाने,
आम्हा रसिकांच्या मनामनात...
रफी - तू अमर आहेस !
सुरगंधर्वा - तू अमर आहेस !
1 note · View note
advpushpapatil · 8 years
Text
खूदी को कर बुलंद…
दहावी-बारावीचा निकाल जसा जवळ येतो, तसे मन हळवे होत जाते. आज-काल या परीक्षांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढतच आहे. एवढेच नव्हे, तर आईवडील-शिक्षक रागावल्यामुळेही मुले आत्महत्या करतात. या कोवळ्या मुलांना मौल्यवान आयुष्याचे महत्त्व कळायलाच हवे. मुलांना वाढवताना-शिकवताना-घडवताना आईवडील आपल्या गरजा, चैन यांना फाटा देऊन आधी मुलांचाच विचार करतात. अशातच मुले कुठे चुकली व कमी पडली म्हणून रागावण्याचाही हक्क आईवडिलांना नसावा.  मुलांनो, कळकळीने सांगावासं वाटतं - तुमचं आयुष्य घडविण्यात आईवडील आणि शिक्षक यांचा फार मोठा वाटा असतो. तुम्ही जेव्हा कमी पडता, तेव्हा ती कमतरता आईवडील आणि शिक्षक यांच्या जिव्हारी लागत असते आणि मग अशावेळी अपेक्षाभंगामुळे ते तुम्हाला रागावले तर त्यांना एवढी मोठी शिक्षा द्यावी तुम्ही? तुमच्या जन्मापासूनच नव्हे, तर जन्माआधीपासून डोळ्यांत ममतेचे कारंजे घेऊन तुम्हाला प्रेमाच्या वर्षावात चिंब न्हाऊ घालणाऱ्या आईवडिलांच्या डोळ्यांत कधीही न आटणारे आषाढमेघ ठेवून जाताना एक क्षणभरही तुम्हाला त्यांचे प्रेम आठवू नये? आपल्यानंतर हे कसे आयुष्य कंठतील? आपल्यावर यांचा एवढाही हक्क नाहीये का? असा साधा विचारही तुमच्या मनात येऊ नये? बोलणे जिव्हारी लागले तर आणखी प्रयत्न करून यश तुमच्याकडे खेचून आणा. बाळांनो, आत्महत्येचा पळपुटा मार्ग अवलंबून इतके सुंदर जीवन मातीमोल नका रे करू! आणि त्या आईवडिलांचं काय? अपत्य गमावल्याचं डोंगराएवढं दुःख तर आहेच; पण आपल्या काळजाचा तुकडा आपल्या रागावण्यामुळे दुरावला ही टोचणी रोज हजारो मरणं देत असणार...  मुलांनो, आत्महत्या करताना आपण आपल्याच जन्मदात्यांना कोणत्या आकाशवेदना देऊन जात आहोत याची कल्पना न येण्याइतपत तुमची पिढी विचारहीन नक्कीच नाहीये. बाळांनो, तुम्हाला उत्तुंग यशाच्या शिखरावर पाहू इच्छिणाऱ्या आईबापांना तुम्ही दुःखाच्या गर्तेत ढकलून देणार? असंही आज-काल "चिल्ड्रेन्स सायकॉलॉजी‘च्या नावाखाली येता-जाता आईबापांच्याच टपलीत मारण्याची फॅशनच झालीय. आधीच तुमचे बिचारे आईवडील या ‘चिल्ड्रेन्स सायकॉलॉजी‘ ला वचकून असतात. त्यात भर घालतात अशा आत्महत्येच्या बातम्या!  माझी एक मैत्रीण आहे. मुलगा दहावीत. (अत्यंत संवेदनशील वर्ष) मुलाला शाळेतून यायला जरा उशीर झाला, की हिचं हृदय दुप्पट वेगाने धडधडायला लागतं. मेंदू दिवसभराच्या घडामोडींवर "सर्फिंग‘ करायला लागतो. "काल मी याला काही बोलले का? "बाबा ओरडले का?‘ "यांच्या मनाविरुद्ध काही घडले का?‘ एकीकडे मुलाच्या मित्रांकडे फोन, शाळा-क्‍लासमध्ये चौकशा आणि तोपर्यंत प्रचंड तणाव, दडपण यामुळे तिच्या जिवाची होणारी घालमेल, तडफड, तगमग.... असाच ताण तिच्यावर सतत येत राहिला तर मला सांगा बाळांनो, त्या माउलीचे पुत्रप्रेमामुळे नाजूक झालेले हृदय किती सहनशक्ती दाखवेल? लक्षात येतंय का गांभीर्य? थोडा विचार करा हाच ताण तुम्हीही तुमच्या आईवडिलांना (त्यांच्या जिवापाड प्रेमाची परतफेड म्हणून) भेट देत आहात का? ही तगमग तुमच्या मनाला भिडू देत. त्यांच्या मनात विश्‍वास निर्माण करा, की तुम्ही जीवन संपविण्याचा अविचार करणार नाही; कधीही. आईबाबांच्या जिवाला या तगमगीतून मुक्त करा रे बाळांनो! कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, बाबा आमटे, प्रकाश आमटे यांच्यासारखे आदर्श तुमच्यासमोर आहेत. अपयशाला पहिली पायरी समजून आपल्या अविरत प्रयत्नांनी, चिकाटीने दुसरी पायरी यशाची बनवा. आपलं नशीब स्वतः घडविण्याची हिंमत स्वतः निर्माण करा. काही पणाला लावायचंच तर आपले प्रयत्न, जिद्द, चिकाटी पणाला लावा. स्वतःचे अनमोल आयुष्य नव्हे!  उर्दू शायर "इक्‍बाल‘ सांगूनच गेलाय....
"खूदी को कर बुलंद इतना,  के हर तकदीर से पहले  खूदा बंदे से खूद पुछे  बता, तेरी रजा क्या है?” (अरे मानवा, स्वतःचं अस्तित्व इतकं बळकट कर, की नशीब लिहिण्याआधी खुद्द विधात्यानेच तुला विचारावं... "सांग, तुझ्या नशिबात काय लिहू?‘)
0 notes